‘वर्क फ्राॅम होम’चे परिणाम! जास्त वेळ बसणे आरोग्यास हानिकारक; कॅन्सर, हृदयरोगाचा धोका… जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मुंबई : लाॅकडाऊनमुळे अनेकजण वर्क फ्राॅर्म होम करत आहेत; मात्र तासनतास एकाच स्थितीत बसून राहिल्याने किंवा बेडवर, सोफ्यावर काम केल्याने आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मान आणि पाठदुखी ओढावू शकते. हे सामान्य असले तरी याची सवय लागणे धोकादायक ठरू शकते. ऐवढेच नव्हे तर यामुळे कर्करोग, हृदयविकारासारख्या गंभीर समस्यांही उद्भवू शकताता. तज्ज्ञ डाॅक्टरांनी याला दुजोरा दिला आहे.

काय पोटाचा घेर वाढतोय? मग हे नक्‍कीच वाचा… 

मेडिकल जरनल जेएएमए ऑन्कोलॉजीने केलेल्या एका सर्व्हेनुसार जास्त वेळ बसून राहिल्याने कॅन्सर आणि हृदयाचे विकारही होण्याची शक्यता आहे. सर्व्हेत चार वर्षात 8000 लोकांवर संशोधन करण्यात आले. लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जास्त वेळ बसल्याने किंवा जास्त हालचाली नसणाऱ्या लोकांना कर्करोगामुळे मृत्यूचा 82 टक्के धोका आहे. जास्त वेळ बसणाऱ्या लोकांपेक्षा अॅक्टिव्ह असणाऱ्या आणि व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये हा धोका कमी प्रमाणात आहे. रोज चालणे, जास्तीज जास्त सायकलिंग करणाऱ्या लोकांना कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका कमी असतो. या लोकांमध्ये कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण 31 टक्के एवढे आहे. त्यामुळे, दैनंदिन जीवनात चालणे, व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच, वर्क फ्रॉम होममुळे आळस वाढल्याचेही सर्व्हेत समोर आले आहे.

अशी घ्या काळजी

  • – एक तासांहून अधिक वेळ झाल्यानंतर थोडावेळ उठून चाला, फिरा.
  • – पाणी पिण्यासाठी किचनमध्ये स्वत: तासाभराने उठा.
  • – एखादा महत्त्वाचा फोन आल्यास बसून न बोलता उठा आणि चालत-फिरत बोला.
  • – स्वत:ची कामं स्वत: करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
  • – जेवण काम करण्याच्या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी करा.
  • – जेवणानंतर लगेच कामाला बसू नका. थोडा वेळ फिरुन कामासाठी बसा.

बैठी जीवनशैलीमुळे 

विविध आजारांना निमंत्रण

लॉकडाऊन कालावधीत सुरु असलेल्या वर्क फ्रॉम होममुळे शारीरीक हालचालीचे प्रमाण कमी झाले आहे. बैठी जीवनशैली विविध आजारांना आमंत्रण देणारी असून विविध प्रकारचे कर्करोग होण्याचा धोकाही या मुळे वाढतो. आतडे, एंडोमेट्रिअल, स्तनांचा कर्करोग, प्रोस्टेट, स्वादुपिंड आणि फुप्फुसांचा कर्करोग बैठ्या जीवनशैलीमुळे होत असल्याचे आढळून आले आहे. बसण्याच्या वेळेत दोन तासांची वाढ झाल्यास हा धोका आणखी वाढत असल्याचे दिसून आले. शारीरिक हालचाल न केल्यास शरीरातील चरबी आणि सूजही वाढते, असे अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे डॉ संकेत शाह यांनी सांगितले.